कवितेचा नवा डिजिटल प्रवास
साहित्य क्षेत्रात कविता हा एक महत्त्वाचा विषय आहे.पण या एकविसाव्या शतकात साहित्य क्षेत्राची ओढ कमी होतेय.संगणक,इंटरनेट यांच्या जमान्यात माणसे ग्रंथालयात जाण्याचे टाळू लागले आहेत. साहित्य क्षेत्राताल्या कवितेला डिजिटल स्वरूपात जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कविता कॅफेची निर्मिती करण्यात आली.
कविता.... एक पेन एक वही म्हणजे कविता, एक व्यक्ती एक उनाड दिवस म्हणजे कविता, एक शांत रात्र म्हणजे कविता, एकांत म्हणजे कविता, कवितेची व्याख्या आपण बदलू तशी बदलणारी, आपण सुचवू तशी सुचणारी. कवितेतून जीवन कळते ते समजते व उमगते. कवितेतून मनातल्या भावना मोजक्या शब्दांत कवी व्यक्त करतो.
कवितेची सुरूवात कशी करायची?, कवितेत नेमके काय मांडायचे? कवितेची शब्द मर्यादा किती असावी? कविता यमकातच असावी का? असे प्रश्न नव्या कवी होऊ पाहणार्या कवीप्रेमींना पडत असतीलच. कविता फक्त एकट्यात,चार भिंतींच्या कॉफी शॉपमध्येच सुचते असेही काहींना वाटते. अशाच काही शंकाचे व प्रश्नांचे निरासन करण्यासाठी कविता कॅफेने चार भिंतीच्या बाहेर, निर्सगाच्या सानिध्यातदेखील कविता सुचू शकते हे पटवून दिले.त्याचबरोबर काव्यरचनेला आणि सादरीकरणाला व्हिडिओचे एक वेगळ माध्यम त्यांनी प्राप्त करून दिले आहे. सायलेन्स, टेक, ओके, साऊंड अँड स्टार्ट असे सूर कधी सागराशी हितगुज करत, कधी क्षितिजाचा कानोसा घेत, तर कधी निसर्गाच्या सुंदर बहरलेल्या मनमोहक मेळाव्यात कवींच्या मनाचे कवडसे अलगद उलगडत आजवर जे घडले नाही ते कविता कॅफेतून पहायला मिळणार आहे.
एक पेन आणि वहीच्या पांढर्या शुभ्र पानावर लिहिलेली कविता. ही कवितेची आतापर्यंत असलेली ओळख.पण या कवितेला वहीच्या बाहेर कॕमेरासोबत,ड्रोनचा वापर करून संपूर्ण निसर्गाच्या अनोख्या दृश्यात टिपलेली कविता म्हणजे “कविता कॅफे”.
डिजिटल आणि टेक्नॉलॉजीच्या या युगात दुर्मिळ होऊ पाहणार्या आजच्या मराठी कवितांचा आवाज तसेच ज्या कवींना आजपर्यंत मंचावरून, संमेलनातून, किंवा मुशायऱ्यातूनच बघितले असे कवी आता कविता कॅफेच्या अनोख्या मांडणीतून पाहायला मिळणार आहे.
हिंदी आणि इंग्रजी कवितांबरोबर मराठी कविता सुद्धा वेगळ्या रूपात कविता कॅफेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे.
कविता कॅफेच्या अशा अनेक नव्या उपक्रमात सहभागी होत राहूया आणि कविता कॅफेच्या यशाची उंची आपल्या सारख्या कवीप्रेमींच्या साथीने वाढू़या.
कविता म्हणजे आरसा.!
जे दिसत ते दाखवणारा,
जे दिसत नाही अभ्यासणारा..
हर्षाली प्रभाकर सावंत
Comments
Post a Comment