जागतिक रंगभूमी दिन.
२७ मार्च...! २७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करतात. रंगभूमी म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे फक्त वेगवेगळी पात्र त्या पात्रातून सादर केलेले नाटक असा समज असतो. १९६१ मध्ये “युनेस्को” च्या इंटरनॅशनल इस्टिट्यूने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये झाला.
विष्णूदास भावे यांच्या “सीता स्वयंर” या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरूवात झाली. त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली. त्यातील एक महत्वाचे वळण म्हणजे संगीत रंगभूमी. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा एक वेगळाच सुवर्णकाळ होता. नाटक हे मराठी माणसाचे पहिले वेड असे म्हणण्यात काही हरकत नाही. चार मराठी माणसे एकत्र आली तर एखादे नाटक सादर झालेच पाहिजे. पोवाडा, भारूड, कीर्तन, दशावतार खेळ ही मुख्य मनोरंजनाचा भाग झाली. “नाटक” या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.
संगीत नाटकांनी परंपरा मागे पडल्यानंतर सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक, विनोदी, रहस्यमय अशा नाटकांनीही काही काळ गाजविला. नाटक म्हणजे पात्र हा समज नाटकांनी खोटा ठरवला. एकांकिका सारख्या मोजक्या पात्रांसह नाटकांचे प्रयोग होऊ लागले. बदलत्या काळानुसार प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार नाटकांचा काळ आणि सादर करण्याचे प्रकारही बदलत राहिले.
डिजिटल सारख्या युगात अगोदर चित्रपट,खासगी दुरचित्रवाहिन्या आणि आता स्मार्ट फोन, संगणक, इंटरनेट यामुळे नाटक टिकणार नाही. अशीही शंका रसिकांच्या मनात आली. वृत्तपत्रांतून येणाऱ्या नाटकांच्या जाहिराती आणि होणारे प्रयोग हे चित्र सुखावह आहे पण खरोखर तशी परिस्थिती आहे का? तसेच रंगभूमीपेक्षा मराठी रंगभूमी खरोखरच समृध्द आहे का? बदलत्या काळात आणि परिस्थितीत टिकून राहिल का? असे अनेक प्रश्न मनात भेडसावत राहिले. वृत्तपत्रांतून येणाऱ्या नाटकांच्या जाहिराती पाहिल्या तर सगळे नाटके जोरदार व्यवसाय करत असतील असे वाटत पण तस नाही काही नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना चांगले बुकींग मिळत नाही.आजही राज्यभरात नाटकांचे वेगवेगळे प्रयोग केले जातात.
एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात. लोकसत्ताने सुरू केलेल्या “लोकांकिका” स्पर्धाेला महाविद्यालयीन तरूणांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि आजही मिळत आहे. नाट्यगृहाची भरमसाठ भाडी, जाहिरातींचे वाढलेले दर, कलाकारांची नाईट, एकमेकांशी असलेली स्पर्धा, नाटकांचा निर्मिती खर्च, प्रेक्षकांचा प्रतिसाद या चक्रव्यूहात आजचे मराठी नाटक सुरू आहे.
सध्याची तरुणाई ही स्मार्ट फोन्स ,Social Media मध्ये गुरफटली आहे. या Social Media ला शत्रू नाही तर मित्र म्हणून पाहून त्याचा मराठी नाटकांच्या प्रसिद्धीसाठी तसेच तरूणाईला मराठी नाटकांकडे वळविण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल यावरही लक्ष दिले पाहिजे. दैनंदिन जीवनातील प्रश्न आणि समाजात जे घडतय त्याचे प्रतिबिंब मराठी नाटकांमधून पाहायला मिळाले पाहिजे.
आज लोकांसाठी नाटक हा मनोरंजनाचा एक पर्याय आहे. सर्व निर्मात्यांचे आणि रंगकर्मीनी जबाबदारीचे काम करून रंगभूमीचे महत्त्व नुसते टिकवायला नको तर अजून रंगभूमीच्या विजयाची उंची सतत वाढली पाहिजे. नवीन रंगकर्मीची नवीन पिढी रंगभूमीवर यायला हवी.
हर्षाली सावंत
Comments
Post a Comment