पहिल्या पावसाची रिमझिम....
पाऊस...... पाऊस या शब्दातचं खरतर थंडावा आहे. जास्ती जास्त जणांचा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा... दरवर्षी जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्याच्या पहिल्या सरीत हव्याश्या गारठ्यात खुप जुन्या आठवणी तो जाग करतो. धावपळीच्या जगात आयुष्य कसं यंत्र बनलेलं असतं. रोजचं आयुष्य हे घड्याळाच्या काट्यांप्रमाणे फिरतचं असत. रोज सकाळी उठा, नाश्ता करा, उन्हाचे चटके खात कधी एकदा ऑफीसच्या ए. सीत जाऊन बसतोय असं होतं. उकाड्याने हैराण झालेल्या प्रत्येकाच्या मनात पाऊस कधी पडतोय? हाच प्रश्न सारखा सतावतो. अचानक चटके देणाऱ्या रखरखत्या उन्हात आभाळ भरतं, वारा भणाणतो , थंडगार वाऱ्याच्या झुळूकाने अंग शहारतं आणि दिवसभराचा तो आळस कुठल्या कुठे गायब होतो, आणि उन्हामुळे त्रासलेला प्रत्येकजण निश्वास सोडतो.
पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद सगळेजण घेतात. पावसाच्या त्या पहिल्या सरीत भिजताना शाळेतील -कॉलेजातील दिवसांमध्ये आपण पुन्हा खेचले जातो आणि जुन्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या होतात.
पाऊस म्हटलं की, त्या पावसासोबत येणारा थंडावा, आकाशात एकत्र येणारे ते काळे ढग, पक्ष्यांची घरट्यात जायची धडपड हे दृश्य डोळ्यांनी सतत पाहत राहवं असं वाटतं. मे च्या उकाड्याने तापलेल्या त्या मातीवर पावसाच्या पहिल्या थेंबामुळे येणारा तो मातीचा सुवास तर काय वर्णावा..! त्या पहिल्या सरीच्या आवाजाने हातातली सगळी काम सोडून त्या पावसात मनमोकळेपणाने भिजायचं, ते टपोरे थेंब अंगावर झेलत आनंदाने नाचायचे यापेक्षा वेगळं सुख अजून काय असु शकतं..! पावसात भिजताना कोणाला शाळेतले दिवस आठवतात तर कोणाला कॉलेजातले...
मे ची सुट्टी संपल्यावर शाळेच्या तयारीत सगळीचं मुलं मग्न होतात. नवीन पावसाळी चप्पल, रंगीबेरंगी छत्र्या, आवडत्या रंगाबरोबर आवडत्या कार्टूनचे रेनकोट घेण्याची तयारी आणि बरंच काही... ! शाळेच्या दिवसात पी.टी. च्या तासाला मैदानात खेळत असताना अचानक येणारा पाऊस त्या पावसामुळे वाया गेलेला पी. टी. चा तास याचा आनंद वेगळाचं ..! पावसाच्या पाण्याने भरलेल्या मैदानात कागदाच्या होड्या सोडत ,उगाचाच चिखल्याच्या पाण्यात उड्या मारतं घरी जाण्याची मज्जाच काही वेगळी होती. कधी पावसातून शाळेत जायचा कंटाळा आला तरं...
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय !
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय !
या गाण्याची आठवण आल्याशिवाय कशी राहिलं. कधीही न विसरण्यासारख्या आठवणी म्हणजे शाळेच्या आठवणी...त्या सांगाव्या तितक्या कमीचं.. शाळेतल्या पावसाबरोबर कॉलेजातला पाऊस विसरून कसा चालेल. पावसाळा चालू झाला की कॉलेजचं लेक्चर बंक करण्याचे प्लॕन चालू होतात. जुहू चौपाटीवर जाऊन मनभरून भिजत राहायचं, मरीन लाईनच्या कट्ट्यावर उभं राहून पावसाच्या सरींसोबत समुद्राच्या लाटांबरोबर केलेली मस्ती आणि चिंब भिजून किनाऱ्यावर लिंबू मीठ लावून चटपटीत भाजलेल्या मक्याची चव कशी विसरून चालेल! कॉलेज आणि पाऊस याच कॉम्बिनेशन सगळ्यात बेस्ट.
उंच डोंगर रानातून कोसळणारा धबधबा आणि पाटातून वाहणारं पाणी यांचे स्वरं कोणत्याही वाद्यातून सुद्धा निर्माण करू शकत नाही. असे स्वरं सारखे ऐकत राहावेसे वाटतात. एखादा लहान मुलाप्रमाणे आनंदाने पावसात नाचणारे पिक बघतचं राहवसं वाटतं. गावाच्या पावसाची गोष्ट सांगून सुद्धा न संपणारी.
पण सगळ्या आठवणी ताज करणारा हा पाऊस कधी रौद्र रूप घेईल याचाही नेम नाही. असो .
स्वर्ग पाहण्यास मिळावा अशी कुणाची इच्छा नसते? पण त्या स्वर्गासाठीही पुण्याईच्या शिदोरीची सोबत असावी लागते, याउलट पृथ्वीवरील स्वर्गाची प्रचीती देणारा हा पाऊस म्हणजे निसर्गातील अनमोल वरदानच! जीवनाला कंटाळलेल्या व मृत्यूची इच्छा झालेल्या एखाद्या व्यक्तीचे मन वळविण्यास या पावसाचे काही थेंबच पुरेसे असतात. अशा या प्रभावी पावसाच्या आगमनाच्या वेळी घडणारा प्रत्येक बदलाव हा सुखदायकच असतो.
खरयं ना...
हर्षाली प्रभाकर सावंत
अप्रतिम वर्णन
ReplyDeleteखूपच सुंदर वर्णन केला आहे तुम्ही
ReplyDelete